Charni road पुलासाठी सैफी रुग्णालयासमोर आंदोलन; मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी
मुंबई :
चर्नी रोड ते गिरगाव परिसराला जोडणाऱ्या प्रस्तावित पुलाच्या कामातील विलंबाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज सैफी रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने केली. गिरगाव पूल बचाव समिती आणि मंगळवाडी–केळेवाडी रहिवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून स्थानिकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
चर्नी रोड आणि गिरगाव या दोन महत्त्वाच्या भागांना सुरक्षितरीत्या जोडणारा पूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पुलाच्या अभावामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या परिसरात यापूर्वी अपघात होऊन जीवितहानी झाल्याचाही दावा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. मुंबई महापालिकेने आवश्यक मान्यता देत निधीची तरतूदही केली होती. काम सुमारे ६० टक्के पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा थांबवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सैफी रुग्णालय प्रशासनाने या प्रकल्पाबाबत कायदेशीर आक्षेप घेतल्यामुळे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.
आंदोलनादरम्यान मंत्री लोढा यांनी पुलाचे काम पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. गिरगावकरांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न असल्याने शासन त्याकडे गांभीर्याने पाहत आहे, असे त्यांनी नमूद केले. कोणत्याही प्रकारची अडथळा निर्माण करणारी मनमानी सहन केली जाणार नाही आणि पुलाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : Mumbai University : एलएलएम परीक्षा पुढे ढकलली
या आंदोलनात नगरसेविका स्नेहल तेंडुलकर, गौरांग झवेरी, रवी सानप तसेच पूल बचाव समितीचे शैलेश पोद्दार, दीपक तळेकर, गौरव शर्मा आणि इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुलाचे काम तातडीने पूर्ण करून परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.



