ACB : राज्यात पाच महिन्यांत ३३५ सापळे; महसूल विभाग आघाडीवर
मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २०२६ या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत (जानेवारी ते मे) राज्यभरात तब्बल ३३५ सापळे यशस्वीपणे रचले आहेत. या कारवायांमध्ये एकूण ४८३ जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यात ७९ खासगी व्यक्तींचाही समावेश आहे.
लाचखोरीच्या सर्वाधिक प्रकरणांमध्ये महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ पोलीस, पंचायत समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) यांच्याशी संबंधित प्रकरणे आढळून आली आहेत.
विभागनिहाय आकडेवारी पाहता, सर्वाधिक ७१ सापळे नाशिक परिक्षेत्रात रचण्यात आले. त्यानंतर पुणे (६७), ठाणे (५१), छत्रपती संभाजीनगर (४६), अमरावती (३०), नांदेड (२७), नागपूर (२७) आणि मुंबई (१६) असे प्रमाण आहे.
गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा सापळ्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. लाचखोरीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र — Monito / Wikimedia Commons, CC BY 2.0)



