FYJC Admission : विशेष चौथ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
तिसऱ्या विशेष फेरीमध्ये १ लाख १२ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश
मुंबई :
इयत्ता अकरावीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून विशेष फेऱ्या राबविण्यात येत आहेत. त्यानुसार नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या विशेष फेरीनंतर प्रवेशापासून वंचित असलेल्या २ लाख ५८ हजार ८० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी संचालनालयाकडून विशेष चौथ्या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ही फेरी २४ जुलैपासून सुरू होत आहे.

अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून आतापर्यंत १५ लाख १८ हजार ९७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रवेशासाठी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या तीन नियमित फेऱ्या व तीन विशेष फेऱ्यांनंतर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी राज्यभरातून १२ लाख ६० हजार ८९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे २ लाख ५८ हजार ८० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्याचवेळी अकरावीच्या ९ लाख ७३ हजार ३०३ जागा अद्यापपर्यंत रिक्त आहेत. अकरावीसाठी अद्यापपर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी शिक्षण संचालनालयाकडून चौथी विशेष फेरी जाहीर केली आहे. या चौथ्या फेरीला २४ जुलैपासून सुरूवात आहे. २४ ते २६ जुलैदरम्यान नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्ज भाग १ मध्ये दुरुस्ती, पसंतीक्रम भरणे, अर्ज लॉक करता येणार आहे. २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांना जागा वाटप जाहीर करण्यात येणार आहे. महाविद्यालयामध्ये जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना २८ जुलै रोजी सकाळी ११ पासून २९ जुलै रोजी सायंकाळी ६ पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर ३१ जुलै रोजी दुपारी १ वाजता रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.
FYJC Admission : तिसऱ्या फेरीमध्ये १ लाख ७ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश
दरम्यान प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या तिसऱ्या फेरीमध्ये १ लाख १२ हजार ८८० विद्यार्थ्यांना जागा वाटप झाले होते. त्यातील १ लाख ७ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये ९६ हजार ५६७ विद्यार्थ्यांनी कॅपद्वारे तर १० हजार ९०५ विद्यार्थ्यांनी कोट्याद्वारे प्रवेश घेतले आहेत. या फेरीमध्ये मुंबई विभागातून सर्वाधिक ३१ हजार १७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल पुणे १६ हजार ४५८, छत्रपती संभाजी नगर १३ हजार ८०, नाशिक ११ हजार ५३७, नागपूर १० हजार ६४०, अमरावती ९ हजार ७३२, कोल्हापूर ८ हजार ६५४ आणि लातूर ६ हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.


