Chemotherapy : शताब्दी रुग्णालयात केमोथेरपी सेवा सुरू होणार
पश्चिम उपनगरातील कर्करोग रुग्णांना मिळणार दिलासा
मुंबई :
कांदिवलीतील मुबंई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (शताब्दी रुग्णालय) स्वतंत्र केमोथेरपी कक्ष सुरू करण्यात येत आहे. या कक्षाचे काम अंतिम टप्प्यात असून, सप्टेंबरपासून हा कक्ष सुरू करण्याचे रुग्णालय प्रशासनाचे नियोजन आहे. या कक्षामुळे पश्चिम उपनगरातील रुग्णांना कर्करोगाशी संबंधित केमोथेरपीच्या उपचारासाठी टाटा रुग्णालयामध्ये जाण्याचा त्रास कमी हाेणार आहे. कर्करोगग्रस्तांना या कक्षामुळे दिलासा मिळणार आहे.
Chemotherapy : स्वतंत्र केमोथेरपी कक्ष सुरू करण्यात येणार
टाटा रुग्णालयामध्ये कर्करोगावरील उपचारासाठी देशभरातून रुग्ण येत असतात. हा भार कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून कर्करोगावरील उपचार सुविधा विविध रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने आता कांदिवली शताब्दी रुग्णालयामध्ये स्वतंत्र केमोथेरपी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षामुळे पश्चिम उपनगरातील बाेरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि आसपासच्या परिसरातील कर्करोग रुग्णांना दिलासा मिळणार आहे. केमोथेरपीसाठी टाटा रुग्णालयात येणाऱ्या या रुग्णांना केमोथेरपीनंतर होणार त्रास, त्यातच करावा लागणार प्रवास यामुळे त्यांना अधिकच समस्यांना सामोरे जावे लागते. रुग्ण व त्यांच्या रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि अशक्त रुग्णांसाठी हा प्रवास अधिक कष्टदायक ठरतो. ही बाब लक्षात घेत उपचारासाठीचा प्रवास, होणारा खर्च आणि उपचारासाठी करावी लागणारी प्रतीक्षा हा त्रास कमी करण्यासाठी कांदिवली शताब्दी रुग्णालयामध्ये केमोथेरपी उपचार सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून केमोथेरपीसाठी आवश्यक उपकरणे, औषधांचा साठा तसेच प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिका उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णांना केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा : मुंबईतील शालिमारसह तीन हॉटेलवर FDA तुकाराम मुंढेची कारवाई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात केमोथेरपी उपचार सुविधा उपलब्ध केल्याने पश्चिम उपनगरातील रुग्णांना घराजवळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे. तसेच त्यांना टाटा रुग्णालयामध्ये केमोथरेपीसाठी जाण्याच्या त्रासातूनही सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच टाटा रुग्णालयावरील भार काही प्रमाणात कमी होऊन तेथील इतर गंभीर रुग्णांना अधिक वेगाने सेवा देता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केमोथेरपी कक्षासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी लागणारी यंत्रणा आणि इतर तयारी पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागेल. सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अजय गुप्ता यांनी सांगितले.



