Mumbai University : ११ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी लिंकिंग अपूर्ण

वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार

मुंबई :

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत मुंबई विद्यापीठांतर्ग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना वैध एबीसी आयडी किंवा अपार आयडी नमूद करणे बंधनकारक केले आहे. मात्र अद्यापपर्यंत मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला एबीसी आयडी/अपार आयडी विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र प्रसिद्ध केले जाणार नाही. परिणामी या विद्यार्थांना परीक्षेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने आपला आयडी लिंक करावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

Mumbai University : परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
मुंबई विद्यापीठ

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रेडिट्सचे डिजिटल स्वरूपात संकलन, संचयन, हस्तांतरण आणि पडताळणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एबीसी आयडी/अपार आयडी अनिवार्य केले आहे. त्यामुळे परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना एबीसी आयडी/अपार आयडी लिंक करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. विविध परिपत्रकांद्वारे विद्यार्थ्यांना एबीसी आयडी/अपार आयडी तयार करून पोर्टलशी जोडण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तसेच यासाठी विशेष शिबिराचे आयोजनही विद्यापीठामार्फत करण्यात आले होते. मात्र, अद्याप जवळपास ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे आढळून आले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे वैध एबीसी आयडी/अपार आयडी उपलब्ध नाही किंवा ज्यांनी तो विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र विद्यापीठामार्फत जारी केले जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी कोणतीही अडचण येऊ नये, त्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी त्यांनी अंतिम वेळेची प्रतीक्षा न करता ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असेही आवाहन मुंबई विद्यापीठाच्या संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

Mumbai University : महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची यादी पाठविली

अद्यापपर्यंत ज्या ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एबीसी आयडी/अपार आयडी विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नाही. अशा विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाने तयार केली आहे. विद्यार्थ्यांची यादी संबंधित महाविद्यालये व संस्थांना देण्यात आली असून, त्यांना या विद्यार्थ्यांचे तातडीने आयडी लिंक करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्राचार्य व विभागप्रमुखांनाही सूचना

सर्व संलग्न व संचालित महाविद्यालये, संस्था, विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संबंधित केंद्रांच्या प्राचार्य, संचालक व विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना याबाबत आवश्यक सूचना देऊन परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचा एबीसी आयडी/अपार आयडी विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडला गेला आहे, याची खात्री करावी, असे निर्देशही मुंबई विद्यापीठाने दिले आहेत.

हेही वाचा : Kurla: बेकायदा बांधकामांवर कारवाई करा – कुर्ला सुधार समिती

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत