certificates at school : विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार दाखले
आपले सरकार सेवा केंद्र नेणार विद्यार्थ्यांच्या दारी
मुंबई :
प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक असणारी विविध दाखले व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागते. यासाठी बऱ्याचदा त्यांना शाळेला दांडी मारावी लागते. परिणामी होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता राज्य सरकारने विद्यार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्र शाळेतच उपलब्ध व्हावेत यासाठी थेट ‘आपले सरकार सेवा केंद्र’च शाळेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या केंद्रातील कर्मचाऱ्यांना ठरावीक दिवशी शाळेमध्ये नेऊन विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राचे कामकाज करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्र शासनाच्या सामायिक सेवा केंद्रे २.० (सीएससी २.०) या योजनेअंतर्गत ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचे प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले असून, नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध केल्या जातात. लोकसंख्येच्या आधारे सेवा केंद्रांचे वाटप करण्यात येते तसेच नागरिकांना ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे विविध सेवांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दहावी व बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना उत्पन्न, जात, अधिवास, राष्ट्रीयत्व यांसारखी विविध प्रमाणपत्रे आणि दाखले सादर करण्याची आवश्यकता असते. हे दाखले व प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांना सेवा केंद्रांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व त्यांना विविध दाखले व प्रमाणपत्रे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने ‘आपले सरकार सेवा केंद्र’च थेट विद्यार्थ्यांच्या दारी नेण्याचा निर्णय घेतला आहे.
certificates at school : जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्येच दाखले काढून द्यावेत
त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’च शाळेत नेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्येच दाखले काढून द्यावेत अशी सोय करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी शाळांमध्ये विशेष शिबिरांचे आयाेजन करावे, तसेच तालुका प्रशासन, ग्रामपंचायत किंवा नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ठराविक दिवशी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचे कामकाज प्राधान्याने पूर्ण करावे, प्रवेश कालावधी किंवा प्रमाणपत्रांची वाढीव मागणी असलेल्या काळात विशेष मोहीम राबविण्यासाठी नियोजन करणे, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालक, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून विद्यार्थ्यांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरातच आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध झाल्यास पालक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.



