BMC : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णांवर ग्लोबल रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार
अतिदक्षता, डायलिसिससह अतिविशेषोपचार सुविधांचा लाभ मिळणार
मुंबई :
महानगरपालिका रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर आता परळमधील ग्लोबल रुग्णालयामध्ये सवलतीच्या दरात उपचार होणार आहेत. मुंबई महानगरपालिका व ग्लोबल रुग्णालयामध्ये झालेल्या करारामुळे या रुग्णालयामध्ये पालिका रुग्णालयातील रुग्णांसाठी ३७ खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात उत्तम उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खासगी रुग्णालयांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अतिविशेषोपचारांची क्षमता आहे, तर महानगरपालिकेकडे व्यापक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा आहे. या दोन्हींचा योग्य समन्वय साधला, तर मुंबईतील आरोग्यसेवेची उपलब्धता आणि परिणामकारकता निश्चितच वाढू शकते, ही बाब लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल रुग्णालयासोबत सांमजस्य करार केला आहे. त्यानुसार ग्लोबल रुग्णालयामध्ये २४५ खाटा असून, त्यापैकी १५ टक्के म्हणजेच ३७ खाटा महापालिकेने नामनिर्देशित केलेल्या पात्र रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये सामान्य रुग्णशय्या, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन उपचार, रक्तशुद्धीकरण आणि आवश्यक अतिविशेषोपचार सुविधांचा समावेश आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांशी संबंधित निर्धारित सवलतीच्या दरांमध्ये पात्र रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. या व्यवस्थेच्या अंमलबजावणीमध्ये केईएम रुग्णालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. पात्र रुग्णांची निवड, त्यांच्या वैद्यकीय गरजांचे परीक्षण आणि ग्लोबल रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठविण्याची प्रक्रिया केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांमार्फत राबविण्यात येईल. त्यामुळे रुग्णांची निवड आणि उपचार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे.
मुंबई महानगरपालिका आणि ग्लोबल रुग्णालयातील सामंजस्य करारामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. भूतकाळातील प्रलंबित दावे आणि महानगरपालिकेचे कायदेशीर अधिकार अबाधित ठेवून भविष्यातील रुग्णसेवेचा मार्ग खुला करणे, हे या सामंजस्य कराराचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्था या परस्परांच्या प्रतिस्पर्धी नसून, योग्य नियोजन आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून एकमेकांच्या पूरक ठरू शकतात, असे महापौर रितू तावडे यांनी यावेळी सांगितले.
BMC : अन्य रुग्णालयांसाठी मार्गदर्शक उपक्रम
मुंबई महानगरपालिका आणि ग्लोबल रुग्णालयामध्ये झालेल्या या कराराची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर अशा प्रकारची व्यवस्था अन्य पात्र खासगी रुग्णालयांमध्येही विकसित करण्यासाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे राखीव खाटा प्रत्यक्ष उपलब्ध होणे, नियमित देखरेख ठेवणे, उपचारांच्या दरांमध्ये पारदर्शकता राहावी आणि रुग्णांना उपचारांसाठी अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी कराराच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी केईएम रुग्णालयावर सोपविण्यात आली आहे.



