SBI LIFE : महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धा : वीर शाह, हृदय मनियारची सातही डावांत बाजी
लावण्या सिंग, विहान अग्रवाल, तिस्या पट्ट आणि दृश्या नाईकही विजेते
मुंबई :
एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात वीर धवल शाह आणि एआयएम हृदय मनियार यांनी सातही डाव जिंकत आपापल्या गटांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत उर्वरित गटात लावण्या सिंग, विहान अग्रवाल, तिस्या पट्ट आणि दृश्या नाईक यांनी विजेतेपद पटकावले. इंडियन चेस स्कूलच्या आयोजनाखाली झालेल्या या स्पर्धेत ९, १३ आणि १७ वर्षांखालील मुले व मुली अशा सहा फिडे मानांकित गटांतून एकूण ३८७ खेळाडूंनी सहभाग घेतला. एसबीआय लाइफ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, तर रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल यजमान होते.

वीर शाहने (जमनाबाई नरसी स्कूल, जेव्हीपीडी) ९ वर्षांखालील खुल्या गटात सातही डाव जिंकत सात गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले. तर १७ वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित हृदय मनियारनेही सात पैकी सात गुणांची कमाई करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ एसबीआय लाइफचे विभागीय संचालक राजीव श्रीवास्तव आणि प्रादेशिक व्यवस्थापक अतुल मेहता यांच्या हस्ते पार पडला. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना चषक व पदके प्रदान करण्यात आली. स्पर्धेसाठी एकूण ६० हजार रुपयांची पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली होती. प्रत्येक गटासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक निश्चित करण्यात आले होते. प्रत्येक गटातील पहिल्या तीन खेळाडूंना चषक, तर चौथ्या ते दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले.
SBI LIFE : वीर धवलची निर्विवाद बाजी
९ वर्षांखालील खुल्या गटात वीर शाह (१५०१) याने सातही डाव जिंकत सात गुणांसह अव्वल स्थान मिळवले. पहिल्या टप्प्यात ७ वर्षांखालील खुल्या गटाचे विजेतेपद मिळवणाऱ्या इवान दुबेने(१५४५) सहा गुणांसह दुसरा, तर जमनाबाई नरसी स्कूलच्याच आरव रवी झावरने (१५७१) सहा गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. सिम्बायोसिस प्रायमरी अँड सेकंडरी स्कूलचा एएफएम अद्विक नवल ५.५ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. पोदार इंटरनॅशनल स्कूलचा ईशान अग्निहोत्री पाचवा, विश्वज्योत हायस्कूलचा आरव देशमुख सहावा, व्हिबग्योर राइज (मालाड) चा एसीएम अगस्त्य पटवा सातवा आणि न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलचा अर्णव वाघमारे आठव्या स्थानावर राहिले. या सर्वांनी ५.५ गुण मिळवले. आयुष तिवारीने पाच गुणांसह नववे, तर शिवाशिष कवितीने पाच गुणांसह दहावे स्थान मिळवले.
लावण्याची सरस कामगिरी
मुलींच्या ९ वर्षांखालील गटात संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या लावण्या सिंगने (१४४८) सहा गुण मिळवत सरस टायब्रेकच्या आधारे विजेतेपद पटकावले. जे. बी. पेटिट हायस्कूल फॉर गर्ल्सच्या इशी सिंगने (१५३८) सहा गुणांसह दुसरा, तर निकिता संदीपने (१४११) सहा गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. कनिष्का गाला ५.५ गुणांसह चौथी, तर लिया कृष्णन ५.५ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. मिराई सरदाना आणि मानसी दानू यांनी प्रत्येकी पाच गुणांसह अनुक्रमे सहावा व सातवा क्रमांक मिळवला. तनिष्का भंडारी आठवी, द्विजा अरोंडेकर नववी, तर साध्या संजय जाधव दहाव्या स्थानावर राहिल्या.
१३ वर्षांखालील गटात विहान अव्वल
१३ वर्षांखालील खुल्या गटात नारायणा ऑलिम्पियाड स्कूलच्या विहान अग्रवाल (१८५८) याने सात डावांत सहा गुण मिळवत विजेतेपद पटकावले. अग्रमानांकित डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूलच्या निर्वाण शाह (१९५६) यालाही सहा गुण मिळाले; मात्र टायब्रेकच्या आधारे त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागला. सांगलीचा एआयएम कश्यप खाखरियाने (१७८९) ५.५ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलचा ओम रामगुडे चौथा, उत्कल शांघवी ग्लोबल स्कूलचा अर्जुन प्रभू पाचवा, तर सेंट मेरीज आयसीएसई स्कूल, माझगावचा विहान राव सहाव्या स्थानावर राहिला. या तिघांसह पहिल्या नऊ स्थानांवरील बहुतांश खेळाडूंनी ५.५ गुणांची कमाई केली. रियान्श द्विवेदी सातवा, सोहम चिखलकर आठवा आणि एएफएम इधांत परमार नवव्या स्थानावर राहिले. शौर्य पाटीलने पाच गुणांसह दहावे स्थान मिळवले.
१३ वर्षांखालील मुलींमध्ये तिस्याला अजिंक्यपद
१३ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्हालॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूलच्या तिस्या पट्ट (१५२४) हिने सात डावांत सहा गुण मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाच्या प्रणिथा भावा (१६५५) हिने ५.५ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. महुआ देशपांडेने पाच गुणांसह तिसरे, तर त्वेशा जैनने पाच गुणांसह चौथे स्थान मिळवले. निश्का अग्रवाल पाचवी आली.
हृदय मनियारची सात गुणांसह हॅट्ट्रिक!
१७ वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित एआयएम हृदय मनियारने(१९१०) संपूर्ण स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखत सातही डाव जिंकले. सात गुणांसह त्याने निर्विवाद वर्चस्व राखले. शौर्य मोदीने (१६२६) ५.५ गुणांसह दुसरा, तर सोहम सहमाते (१६६७) याने समान गुणांसह तिसरा क्रमांक संपादला. युवराज सिंग आणि आराध्य गावकर यांनी प्रत्येकी पाच गुण मिळवत अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.
दृश्या नाईकचे दमदार यश
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित दृश्या नाईकने (१७१३) सात डावांत ६.५ गुण मिळवत निर्विवाद विजेतेपद पटकावले. तिने आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा दीड गुणांची आघाडी घेतली. इक्षा सोनीने (१५२८) पाच गुणांसह दुसरा, तर श्रेया जोशी (१५२५) हिने पाच गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. सायना नागरकट्टे पाच गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली. पहिल्या टप्प्यात १५ वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवणाऱ्या खानक पहारियाने ४.५ गुणांसह पाचवे स्थान मिळवले.
SBI LIFE : राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निश्चित
या स्पर्धेला १६ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणीचे स्वरूप होते. सहाही गटांतील पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.



