BMC : वाढीव विद्यावेतनापासून महापालिकेचे विद्यार्थी वंचित
फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या तुलनेत कमी विद्यावेतन
मुंबई :
फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीचे शिक्षण घेणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने १ जून २०२५ रोजी घेतला. मात्र दीड वर्ष उलटले तरी मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शीव, नायर रुग्णालयातील विद्यार्थ्यांना वाढीव विद्यावेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. समान शैक्षणिक पात्रता आणि जबाबदाऱ्या असूनही राज्य शासन व महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात तफावत असल्याचे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे १ जून २०२५ पासून फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आंतरवासिता करणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांचे विद्यावेतन प्रतिमहिना १ हजार ७५० रुपयांवरून ८ हजार रुपये, तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे विद्यावेतन १७ हजार ३६० रुपयांवरून ३४ हजार ७९० रुपये करण्यात आले आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर व शीव या वैद्यकीय महाविद्यालयांतील फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपीच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अद्याप ही वाढ लागू करण्यात आलेली नाही. समान शैक्षणिक पात्रता आणि जबाबदाऱ्या असूनही राज्य शासन व महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यावेतनात तफावत असल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही तफावत दूर करून महापालिकेच्या विद्यार्थ्यांनाही सुधारित विद्यावेतन लागू करावे, अशी त्यांची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या धर्तीवर विद्यावेतन वाढवण्याची मागणी ३० जुलै २०२५ पासून विद्यार्थी करत आहेत. या मागणीसाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी अँड ऑक्युपेशनल थेरपी रेसिडेंट्स अँड इंटर्न्स (एमएपीओआरआय) या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांच्या माध्यमातून महापौरांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या भेटीदरम्यान एमएपीओआरआयच्या वतीने डॉ. चैतन्य ढाकणे, डॉ. सिद्धेश खंडागळे, डॉ. तनय भराडकर आणि डॉ. ऋषिकेश माळवे उपस्थित होते.
BMC : विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लावणार – महापौर
केईएम, नायर, शीव रुग्णालयातील फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाची महापौर रितू तावडे यांनी दखल घेत हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले आहे. त्यामुळे लवकरच फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपीच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



