Malaria : मुंबईमध्ये हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई :

२०३० पर्यंत हिवताप मुक्त महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यानुसार हिवतापाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र मुंबईमध्ये हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट होण्याऐवजी मागील पाच वर्षांमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मागील पाच वर्षांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत ४ हजारांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांना माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये मागील पाच वर्षांमध्ये हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२२ मध्ये हिवतापाचे ३ हजार ९८५ रुग्ण सापडले होते. तर यंदा ऑक्टोबरपर्यंत १२ हजार ५७४ रुग्ण सापडले आहेत. यावरून मागील पाच वर्षांत रुग्णांच्या संख्येत तीन पटीने वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ७३१९ रुग्ण, २०२४ मध्ये ७९३९ रुग्ण, २०२५ मध्ये १० हजार १६३ रुग्ण सापडले आहेत. तर ऑक्टोबर २०२६ पर्यंत १२ हजार ५७४ रुग्ण सापडले आहेत. २०२५ ऑक्टोबरपर्यंत हिवतापाचे ८ हजार ५२१ रुग्ण आढळले होते. म्हणजेच एका वर्षात हिवतापाच्या रुग्णांमध्ये ४ हजार ५३ ने वाढ झाली असून, रुग्णसंख्या जवळपास दीडपट झाली आहे. त्यामुळे एकीकडे राज्य सरकारकडून हिवताप मुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघे तीन ते चार वर्ष असताना मुंबईमध्ये हिवतापाच्या रुग्णांची संख्या सातत्ययाने वाढत असल्याने हिवतापमुक्त महाराष्ट्राला मुंबईतच हरताळ फासला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबरपर्यंत मुंबईमध्ये ७१० रुग्ण सापडले होते. तर ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुंबईमध्ये चिकनगुनियाचे अवघे ११३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तब्बल ५९७ रुग्णांची घट झाली आहे.

Malaria : चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत घट

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हिवतापाच्या रुग्णसंख्येतील वाढीचे स्पष्टीकरण देताना मागील काही वर्षांमध्ये चाचण्यांमध्ये वाढ झाल्याने रुग्ण आढळण्याचे सांगितले जाते. मात्र, चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येतील घट ही प्रत्यक्ष आजाराचे प्रमाण कमी झाले आहे की, तपासणी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, याचेही विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. व्ही. एन. देसाई रुग्णालय, भाभा रुग्णालय, राजावाडी रुग्णालय यांसारख्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये चिकनगुनियाच्या निदानासाठी आवश्यक असलेली एलिसा चाचणीची सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याची नोंद करताना प्रत्यक्ष तपासण्यांची संख्या, उपलब्ध निदान सुविधा आणि रुग्णालयांमधील चाचण्यांची स्थिती यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा : CJP आंदोलनातील रद्द केलेल्या FIR ची माहिती देण्यास मुंबई पोलिसांकडून टाळाटाळ

Views: 2

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत