Firecrackers : फटाक्यांमुळे वाढताेय डोळ्यांच्या दुखापतींचा धाेका
दररोज २५ ते ३० रुग्ण उपचारासाठी येत असल्याने डॉक्टरांचा सावधगिरीचा सल्ला
मुंबई :
दिवाळीमध्ये फटाके फोडताना दरवर्षी डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असते. दिवाळीमध्ये फटाके डोळ्यांच्या जवळ फुटल्यामुळे बहुतांश दुखापती होतात. त्यामुळे डोळे भाजणे, कॉर्नियावर ओरखडे पडणे आणि गंभीर प्रकरणांत कायमची दृष्टी जाणे असे परिणाम होऊ शकतात. दिवाळीमध्ये फटाके फोडताना डोळ्यांना इजा झाल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या २५ ते ३० इतकी आहे. फटाके फोडणाऱ्यांनाच नव्हे, तर जवळ उभ्या असलेल्यांना धोका असतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात डोळ्यांच्या दुखापतींमध्ये वाढ होत असल्याने नेत्रतज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी करण्यात येत असून, फटाके फोडण्यात येत आहेत. मात्र हे फटाके फाेडताना बाहेर पडणारा धूर थेट डोळ्यात गेल्याने डोळे चुरचुरणे, डोळ्यांच्या पारदर्शक पटलाला (कॉर्निया) इजा, डोळ्यांत परकीय वस्तू जाणे, फटाक्यांच्या स्फोटामुळे डोळ्यांतील रक्तवाहिन्यांना इजा होऊन अंतर्गत रक्तस्राव होणे, रासायनिक घटक असलेल्या फटाक्यांमधील पदार्थ डोळ्यांत गेल्यास जळजळ असे प्रकार अधिक होत असतात. दरवर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. दररोज साधारणपणे ३० ते ३५ रुग्ण उपचारासाठी येत असतात. यामध्ये लहान मुलांसह मोठ्यांचाही सहभागी असतो. दिवाळीला सुरुवात झाल्यापासून दोन दिवसांमध्ये रुग्णांची संख्या कमी असली तरी पुढील दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शशी कपूर यांनी दिली.

फटाके फोडताना डोळ्यांना इजा झाली म्हणून दररोज सुमारे २५ ते ३० रुग्ण उपचाचरासाठी येतात. दिवाळीला आता सुरुवात झाली असल्याने पुढील काही दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. रुग्णांमध्ये डोळे भाजणे, डोळ्यांत वस्तू घुसणे अशा दुखापतींचा समावेश असतो. अनेकदा फटाके व्यवस्थित न फुटणे किंवा पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशा घटना घडतात. ग्रीन फटाक्यांमधूनही धूर आणि सूक्ष्म कण बाहेर पडतात. त्यामुळे डोळ्यांना जळजळ होऊ शकते, असे डॉ. सुप्रिया श्रीगणेश यांनी सांगितले.
दरवर्षी फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापतींमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. फटाक्यांची अगदी छोटी ठिणगी किंवा कणदेखील डोळ्यांना गंभीर इजा पोहोचवू शकतो. फटाके फोडणाऱ्या व्यक्तींनाच नव्हे, तर आसपास उभ्या असलेल्या व्यक्तींनाही डोळ्यांच्या दुखापतींचा धोका असतो, त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्ज्ञ डॉ. वंदना जैन यांनी दिला आहे.
Firecrackers : दिवाळीमध्ये मेकअप करताना काळजी घ्या
दिवाळीमध्ये तरुणी व महिला मोठ्या प्रमाणात मेकअप करत असतात. यामध्ये आकर्षक मेकअप करणे आणि रंगीत कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याकडे त्यांचा कल अधिक असतो. मात्र ग्लिटरयुक्त मेकअपमधील बारीक कण डोळ्यांत गेल्यास तीव्र जळजळ होऊ शकते. तसेच योग्य आकाराच्या नसलेल्या किंवा नियमन नसलेल्या रंगीत कॉन्टॅक्ट लेन्समुळे कॉर्नियाच्या पृष्ठभागाला इजा होऊन संसर्ग, कॉर्नियल अल्सर आणि अन्य दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवाळीमध्ये फटाक्यांबरोबरच सौंदर्यप्रसाधानांचाचही जपून वापर करण्याचा सल्ला डॉ. सुप्रिया श्रीगणेश यांनी दिला.
Firecrackers : ‘सुरक्षित डोळे-सुरक्षित दिवाळी’ उपक्रम
दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे लहान मुलांच्या डोळ्यांना दुखापत होण्याची घटना घडत असतात. नेत्रतज्ञांकडून वेळीच उपचार न मिळाल्यास काही दुखापतीमुळे दृष्टीचे कायमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे १५ वर्षांखालील मुलांवर उपचार करण्यासाठी ‘सुरक्षित डोळे, सुरक्षित दिवाळी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत गतवर्षी ५०० हून अधिक मुलांवर उपचार करण्यात आले होते. यंदा ४ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती डॉ.अरुण सिंघवी यांनी दिली. या उपक्रमांतर्गत प्रथमोपचार, डोळ्यांशी संबंधित आपत्कालीन काळजी, औषधोपचार आणि जिथे आवश्यकता असेल तिथे शस्त्रक्रियेचा समावेश आहे.



