Inter-Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम
१६ नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात भिडणार, १८ नोव्हेंबरपासून गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेचा थरार
मुंबई :
मुंबई रुग्णालयांच्या विश्वात आता क्रिकेटचा धुरळा उडणार आहे. मुंबईतील रुग्णालयीन क्रिकेटपटूंसाठी प्रतिष्ठेचा ‘वर्ल्ड कप’ मानल्या जाणाऱ्या हिंदुजा-टाटा रुग्णालय आयोजित गिरनार चहा पुरस्कृत आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम १८ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. मुंबईतील १६ नामांकित रुग्णालयांचे संघ या स्पर्धेत विजेतेपदासाठी मैदानात उतरतील. ब्रीच कँडी आणि कोकिळाबेन अंबानी या एलिट गटातील दोन बलाढ्य संघांमधील लढतीने स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे.

गेली तब्बल ३३ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या स्पर्धेने मुंबईच्या क्रिकेटविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदुजा आणि टाटा रुग्णालयातील क्रिकेटप्रेमी कर्मचाऱ्यांच्या जिद्दीतून आणि अथक परिश्रमांतून या स्पर्धेची परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे. मिलिंद सावंत आणि डॉ. हुमायूं जाफरी यांच्या पुढाकारातून १९९४ मध्ये या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. तीन दशकांनंतरही या स्पर्धेचा उत्साह ओसरलेला नाही, हेच तिचे मोठे यश आहे. या स्पर्धेचे उद्घाटन १७ नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, कोषाध्यक्ष अरमान मलिक आणि स्पर्धा सचिव विघ्नेश कदम यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कच्या बंगाल क्लबमध्ये होणार असल्याची माहिती आयोजक मिलिंद सावंत यांनी दिली. याप्रसंगी सर्व संघाना किटचे वाटप केले जाणार आहे.
Inter-Hospital Cricket Tournament : एलिट आणि प्लेट अशा दोन गटांत रंगणार
यंदाची स्पर्धाही एलिट आणि प्लेट अशा दोन गटांत रंगणार आहे. एलिट गटात मुंबईतील आठ नामांकित रुग्णालयांचे संघ विजेतेपदासाठी एकमेकांना आव्हान देतील, तर प्लेट गटातही आठ संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. एलिट गटात नानावटी, हिंदुजा, टाटा, जे. जे., केईएम, जसलोक, ब्रीच कँडी आणि कोकिळाबेन अंबानी या संघांचा समावेश आहे. तर प्लेट गटात बॉम्बे , हिरानंदानी, रहेजा, लोकमान्य टिळक, कस्तुरबा, लीलावती आणि ग्लेन ईगल्स हे रुग्णालयीन संघ आपले कौशल्य पणाला लावतील.
नव्या प्रतिभेला संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ
या स्पर्धेने केवळ रुग्णालयीन क्रिकेटपटूंना व्यासपीठ दिले नाही, तर मुंबई क्रिकेटला नंदू पाटील, अविनाश जाधव, जीतेंद्र परदेशी, ओंकार जाधव, श्रीकांत दुधवडकर आणि प्रदीप क्षीरसागर यांच्यासारखे गुणवंत क्रिकेटपटूही दिले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा केवळ रुग्णालयांमधील क्रिकेटची चुरस नसून नव्या प्रतिभेला संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे.
स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यासाठी गिरनार रुग्णालय स्पर्धा समितीचे अध्यक्ष जॉय चक्रवर्ती, सचिव डॉ. हुमायू जाफरी, कोषाध्यक्ष मिलिंद सावंत आणि संयुक्त सचिव अनिल बैकर विशेष मेहनत घेत आहेत. ३३ वर्षांची समृद्ध परंपरा, १६ संघांचा सहभाग आणि प्रतिष्ठेचे विजेतेपद यामुळे यंदाच्या गिरनार स्पर्धेतही क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार, याबाबत कुणाच्याही मनात तीळमात्र शंका नाही.



