MRI machine : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय यंत्र

केईएम, शीव, नायर आणि कूपर या चार प्रमुख रुग्णालयांमधील रुग्णांना होणार लाभ

मुंबई :

केईएम, शीव, नायर आणि कूपर या मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील एमआरआय यंत्रणा अनेक वर्ष बंद असल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. अनेकदा रुग्णालय प्रशासनाकडून यंत्राची दुरुस्ती करून रुग्णसेवा पुरविण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये मागील अनेक वर्षांपासून अत्याधुनिक ३-टेस्ला एमआरआय यंत्र आणण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू होत्या. मात्र लालफितीच्या फेऱ्यात अडकलेली ही प्रक्रिया अखेर मार्गी लागली असून, आता या चारही रुग्णालयामध्ये अद्ययावत एमआरआय यंत्र उपलब्ध होणार आहे.

MRI machine
केईएम, शीव, नायर आणि कूपर या चार प्रमुख रुग्णालयांमधील रुग्णांना होणार लाभ

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयामध्ये एमआरआय यंत्रणा बंद असल्याने रुग्णांना खासगीरित्या एमआरआय काढावे लागत असे. त्यामुळे रुग्णांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असे. परिणामी अनेक गरीब रुग्णांसाठी महापालिका रुग्णालयातील उपचारही महागडे वाटू लागले होते. रुग्णालयातील एमआरआय यंत्राची गरज लक्षात घेत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही यंत्र खरेदी प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे लालफितीच्या फेऱ्यात अडकली होती. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांना तब्बल सात वर्ष एमआरआयच्या सुविधेपासून वंचित राहावे लागले आहे.

MRI machine : गंभीर आजारांचे निदान अधिक प्रभावीपणे करणे शक्य

गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सुविधेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी पाठपुरावा केल्याने अखेर या एमआरआय यंत्राचा मार्ग मोकळा झाला आहे. या अत्याधुनिक यंत्रामुळे रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. ३-टेस्ला तंत्रज्ञानामुळे शरीरातील विविध अवयवांच्या अधिक स्पष्ट आणि अचूक प्रतिमा मिळणार आहेत. गंभीर आजारांचे निदान अधिक प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालये आणि निदान केंद्रांमध्ये हजारो रुपये खर्च करून करावी लागणारी एमआरआय तपासणी आता सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या माफक दरात उपलब्ध होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये केवळ अत्याधुनिक एमआरआय यंत्र उपलब्ध करून द्यायचे नसून, रुग्णालयांमधील निदान सुविधा आधुनिक करण्याचा उद्देश आहे. या अत्याधुनिक यंत्रामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी ही सुविधा विशेष लाभदायक ठरणार आहे. मुंबईकरांच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
– हरिष भांदिर्गे, आरोग्य समिती अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका

हेही वाचा : BMC : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णांवर ग्लोबल रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार

Views: 2

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत