PAT exam – शिक्षकांअभावी सफाई कामगारांनी घेतली परीक्षा
मुंबई :
राज्यामध्ये शनिवारी पॅट परीक्षेचा पहिला प्रथम भाषेचा पेपर झाला. मात्र मुंबईतील महानगरपालिकेच्या अनेक शाळांमधील शिक्षकांना पूर्णवेळ निवडणुकीचे काम लावल्याने परीक्षा घेण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नव्हते. त्यामुळे शाळांमधील मुख्याध्यापकांनी अखेर पर्यवेक्षकांची जबाबदारी सफाई कामगार व काही पालकांवर सोपवल्याचा अजब प्रकार शनिवारी घडला आहे. या प्रकारामुळे शाळेतील पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गुणवत्ता तपासण्यासाठी PAT परीक्षा
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) पॅट परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदाही ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी पॅट परक्षेचे पेपर होणार आहेत. त्यानुसार शनिवारी प्रथम भाषेचा पहिला पेपर शाळेमध्ये पार पडला. एससीईआरटीकडून प्रश्नपत्रिका अपुुऱ्या आल्याने मुख्याध्यापकांसमोर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशा उपलब्ध करून द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला होता.
PAT परीक्षा कशी घ्यायचा शाळा प्रशासनासमार प्रश्न
त्यातच मुंबईतील दोन हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनाी तातडीने निवडणूक कामासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीत. परिणाम शनिवारी घेण्यात आलेल्या पॅट परीक्षेच्या पहिल्या पेपरवेळी मुख्याध्यापकांसमोर परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्न पडला होता. त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेच्या बहुतांश शाळांमधील मुख्याध्यापकांनी अखेर शाळेतील सफाई कामगारांना वर्गावर पर्यवेक्षक म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला. तर काही शाळांमधील मुख्याध्यापकांनी थेट पालकांनाच विनंती करून त्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपवली.
गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता
परीक्षेसाठी पर्यवेक्षकाची जबाबदारी सफाई कामगार व पालकांवर सोपविल्यामुळे पॅट परीक्षेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सफाई कामगार व पालक पर्यवेक्षक असलेल्या वर्गावर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नक्कल (कॉपी) केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये असा प्रकार घडला तेथील शाळांमधील पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
शिक्षकांना परीक्षा कालावधीत मुभा देण्याची मागणी
शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने पॅट परीक्षेच्या पहिल्या दिवशी घडलेला प्रकार पुढे घडू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित व भविष्य लक्षात घेत परीक्षा कालावधीत शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुभा देण्यात यावी, अशी मागणी शाळांमधील मुख्याध्यापकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा ; IIPH : राज्यात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ’ होणार


