Rajawadi Hospital: महिलेच्या पोटातून काढली ५.५ किलोची गाठ
अत्यंत दुर्मिळ अशा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर
मुंबई :
दोन वर्षांपासून पोटाची वाढती सूज, बोथट पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास यासारख्या आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असलेल्या मानखुर्दमधील ४६ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून सुमारे ५.५ किलो वजन आणि ३० सेंटीमीटर आकाराची गाठ काढण्यात मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. राजावाडी रुग्णालयामध्ये दूर्मिळ शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाल्याने रुग्णांना दिलासा मिळू लागला आहे.
पोटात सतत दुखत असल्याने मानखुर्द येथील ४६ वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आली. तिचा त्रास लक्षात घेत डॉक्टरांनी तिचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि आवश्यक तपासण्या केल्या. या तपासणीमध्ये त्या महिलेच्या पोटामध्ये सुमारे ३० सेमी आकाराची गर्भाशयातील गाठ (ट्युमर) असल्याचे निदान झाले. प्राथमिक निदानानुसार ही गाठ जायंट लिओमायोमा असल्याचा संशय डॉक्टरांना होता. शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सर्व आवश्यक खबरदारी व नियोजन करत डॉक्टरांकडून रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

ट्युमरचा मोठा आकार आणि त्यामधील वाढलेली रक्तवाहिन्यांची जाळी यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिलेल्या गर्भाशयातून तब्बल ५.५ किलोची गाठ काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आलेली ही गाठ हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. या चाचणीचा अंतिम अहवाल प्रतीक्षेत असून, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही गाठ किंवा ट्युमर नेमका कसला आहे, हे स्पष्ट होईल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर विशेष काळजीपूर्वक उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी महिलेची प्रकृती असल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. महिलेच्या गर्भाशयातून काढण्यात आलेली ही मोठ्या आकाराची गाठ अत्यंत दुर्मिळ असल्याची माहिती डॉ. स्वाधिना मोहंती यांनी दिली.
Rajawadi Hospital : या डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया
स्त्री रोग विभागामार्फत करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. स्वाधिना बी. मोहंती, डॉ. शालिनी बगारिया, डॉ. अरवा कांबळे आणि डॉ. काजल साळवी यांनी महत्वाची भूमिका बजावली. भूलतज्ज्ञ डॉ. छवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रेयश आणि डॉ. नेत्रा यांनी भूल विभागाची जबाबदारी सांभाळली. तसेच परिचारिका नीलाक्षी गुरव आणि त्यांच्या तुकडीने शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले.



