पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक Kho-Kho स्पर्धेचे’ विजेते

आदित्य गणपुले, वृषभ वाघ आणि अभय रत्नाकर यांनी जिंकून दिला किताब

मुंबई :

परळच्या लाल मैदानावर रंगलेला ‘आरबीआय व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धा २०२६’चा अंतिम सामना हा केवळ दोन रेल्वे संघांमधील लढत नव्हती, तर तो प्रतिष्ठा, अनुभव, संयम आणि रणनीतीचा खरा कस पाहणारा महामुकाबला होता. जानेवारी २०२६ मध्ये मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत पश्चिम रेल्वेला हरवणाऱ्या मध्य रेल्वेकडून पुन्हा एकदा वर्चस्वाची अपेक्षा होती; मात्र पश्चिम रेल्वेने यावेळी कोणतीही चूक न करता अत्यंत शिस्तबद्ध आणि परिपक्व खेळ करत १५-११ असा दणदणीत विजय मिळवत ‘आरबीआय चषका’वर नाव कोरले. हा विजय सरावातील सातत्य, नियोजन आणि उत्कृष्ट संघबांधणीचे फलित होते.

Kho-Kho : नाणेफेक जिंकली, पण सामना गमावला!

मध्य रेल्वेने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारले, पण त्याचा अपेक्षित फायदा त्यांना उचलता आला नाही. उलट सुरुवातीपासूनच पश्चिम रेल्वेने आक्रमणात धार दाखवत मध्य रेल्वेच्या संरक्षणफळीवर सतत दबाव निर्माण केला. मध्यंतरालाच १०-५ अशी घेतलेली आघाडीच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. मध्य रेल्वेचा बचाव काही वेळा चांगला दिसला, पण निर्णायक क्षणी गुण मिळवण्यात त्यांना अपयश आले. विशेषतः आक्रमणावेळी समन्वयाचा अभाव स्पष्ट जाणवत होता. या सामन्यावर तुषार चिखले यांनी पंचप्रमुख म्हणून तर सुशील दहींबेकर व देवेंद्र बर्डे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Kho-Kho स्पर्धेत पश्चिम रेल्वे विजयी - voice of eastern
पश्चिम रेल्वे विजयी

पश्चिम रेल्वेचा ‘राजेशाही धमाका’; प्रत्येक खेळाडूने उचलली जबाबदारी

या विजयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम रेल्वेचा सांघिक खेळ. एका-दोन खेळाडूंवर अवलंबून न राहता संपूर्ण संघाने जबाबदारी उचलली. वृषभ वाघ यांनी २.३० व २.५० मिनिटांचे भक्कम संरक्षण करत मध्य रेल्वेच्या आक्रमणाची धार बोथट केली. आदित्य गणपुले यांनी २ आणि २.४० मिनिटांचे संरक्षण करत ४ महत्त्वाचे गुण मिळवले आणि सामन्याचे खरे ‘गेम चेंजर’ ठरले. राहुल मंडल (२, १.१० मि. संरक्षण व १ गुण), महेश शिंदे (१, १.५० मि. संरक्षण), विजय शिंदे (१ मि. संरक्षण व २ गुण), अभय रत्नाकर, अमित पाटील, निखिल सोडिये आणि मजहर जमादार (प्रत्येकी २ गुण) यांनी सामन्यात वेळोवेळी योगदान देत पश्चिम रेल्वेचा विजय पक्का केला. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेच्या खेळात आत्मविश्वास आणि नियंत्रण स्पष्ट दिसत होते. त्यांनी घाईगडबड न करता परिस्थितीनुसार खेळ केला. अंतिम क्षणांपर्यंत त्यांनी मध्य रेल्वेला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. हेच खऱ्या चॅम्पियन संघाचे लक्षण म्हणावे लागेल.

मध्य रेल्वेची झुंज कौतुकास्पद; पण चुका ठरल्या महागात

पराभव झाला असला तरी मध्य रेल्वेने हार मानली नाही. रामजी कश्यप यांनी २.३० व नाबाद १.४० मिनिटांचे संरक्षण व व १ गुण मिळवत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दिलीप खांडवीने (१.३०, १.३० मि. संरक्षण व ३ गुण) सामन्यात रंगत कायम ठेवली. शुभम थोरात (१, २.५० मि. संरक्षण १ गुण ), आकाश तोगरे (१.२० मि. संरक्षण ), सौरभ घाडगे (१.१०मि. संरक्षण २ गुण) आणि अर्णव पाटणकर (२ गुण) यांनीही झुंजार खेळ केला. मात्र संपूर्ण सामन्यात मध्य रेल्वेची सर्वात मोठी अडचण ठरली ती म्हणजे सातत्याचा अभाव व आक्रमणात झालेल्या चुका त्यांना चांगल्याच महागात पडल्या. पण तसेच संरक्षणात सुध्दा आडाखे चुकल्याचे स्पष्ट दिसत होते. दबावाखाली घेतलेले निर्णय त्यांना महागात पडले.

महाराष्ट्र पोष्टला तृतीय क्रमांक

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात महाराष्ट्र पोष्टने रचना नोटरी वर्क्सचा ४ मि. राखून १४-१२ असा २ गुणांनी धुव्वा उडवत विजय मिळवला.

आदित्य गणपुले आणि अभय रत्नाकर ठरले स्पर्धेचे खरे हिरो

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांकडे पाहिले तरी पश्चिम रेल्वेच्या वर्चस्वाचीच साक्ष मिळते. अभय रत्नाकर यांना ‘सर्वोत्कृष्ट आक्रमक’, तर आदित्य गणपुले यांना ‘सर्वोत्कृष्ट अष्टपैलू’ पुरस्कार मिळाला. मध्य रेल्वेच्या शुभम थोरात यांनी ‘सर्वोत्कृष्ट संरक्षक’ पुरस्कार पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या तिन्ही खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. पश्चिम रेल्वेने दिला स्पष्ट संदेश! या अंतिम सामन्याने एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे पश्चिम रेल्वे हा संघ आता केवळ नावापुरता मजबूत नाही, तर मोठ्या सामन्यांमध्ये दबाव झेलून विजय मिळवणारा परिपक्व संघ बनला आहे. अमर हिंद स्पर्धेतील विजेतेपद योगायोग नव्हता, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. दुसरीकडे मध्य रेल्वेला आपल्या रणनीती आणि निर्णायक क्षणांतील कामगिरीवर गंभीरपणे विचार करावा लागेल.

Kho-Kho दिमाखदार बक्षीस वितरण सोहळा

स्पर्धेतील विजेत्या संघाला रु. २५,०००/- व चषक, तर उपविजेत्या संघाला रु. १५,०००/- व चषक देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत ६०,०००/- हजार रुपयांची बक्षिसे वाटली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुनीत पांचोली (मुख्य महाप्रबंधक, आरबीआय, मुंबई विभाग) यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी सचिन नरसप्पा (सचिव, आरबीआय स्पोर्ट्स क्लब), सचिन तांबे (बाह्यविभाग सचिव, आरबीआय स्पोर्ट्स क्लब), यशवंत नाईक, राजेश पाथरे, नानासाहेब झांबरे, बाळासाहेब तोरसकर, पराग आंबेकर, सुरेंद्र विश्वकर्मा उपस्थित होते.

हेही वाचा : Blood Shortage : मुंबईतील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा

परळच्या लाल मैदानावरील हा अंतिम सामना खो-खो चाहत्यांसाठी दीर्घकाळ लक्षात राहणारा ठरला आणि ‘आरबीआय व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धा २०२६’ने व्यावसायिक खो-खोला नवे उंचीवर नेल्याचे पुन्हा अधोरेखित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *