SBI LIFE : महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा : आघाडी मिळवण्यासाठी जोरदार चुरस
९ वर्षाखालील खुल्या गटात चार खेळाडू संयुक्तरित्या आघाडीवर
मुंबई :
एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात चौथ्या फेरीनंतर आघाडीसाठी अक्षरशः बुद्धीसंग्राम सुरू झाले आहे. दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत युवा बुद्धिबळपटूंनी आपल्या चालींच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवे आव्हान दिले. त्यामुळे आघाडी राखण्यासाठी जोरदार चुरस रंगली आहे.

इंडियन चेस स्कूलच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेत ९, १३ आणि १७ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या अशा सहा फिडे मानांकित गटांत तब्बल ३८७ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. चार फेऱ्यांनंतर काही गटांत संयुक्त आघाडीचे चित्र निर्माण झाले असून, विशेषतः १३ वर्षांखालील मुलींच्या गटातील सहा खेळाडूंची बरोबरी स्पर्धेतील उत्कंठा अधिकच वाढवणारी ठरली आहे.
SBI LIFE : ९ वर्षांखालील खुल्या गटात चौघांचा विजयी चौकार
या गटात चार खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना एकही संधी न देता सलग चार विजयांची नोंद केली आहे. विबग्योर राइज, मालाड (पश्चिम)चा एसीएम अगस्त्य पटवा (१५२७), जमनाबाई नरसी स्कूल, जेव्हीपीडीचा वीर शाह (१५०१), सिम्बायोसिस प्रायमरी अँड सेकंडरी स्कूलचा एएफएम अद्विक नवल (१४७६) आणि संजीवनी वर्ल्ड स्कूल, दहिसरचा अथर्व मुळीक (१४८३) यांनी प्रत्येकी चार गुणांची कमाई करत संयुक्त आघाडीवर झेप घेतली आहे. अवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूलचा एएफएम शिवांश कारिया (१५०६), पोदार इंटरनॅशनल स्कूलचा ईशान अग्निहोत्री (१६१८) आणि मॅट्रिक्स अकॅडमी स्कूलचा मानांकन नसलेला वीरेन बोरिचा हे प्रत्येकी साडेतीन गुणांसह आघाडीच्या चौकडीचा पाठलाग करत आहेत.
चैतन्या-मनवा आघाडीवर
मुलींच्या या गटात दादरच्या जे. बी. वाच्छा हायस्कूलची मानांकन नसलेली चैतन्या नागराळे आणि ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, कांदिवलीची एएफएम मनवा पारकर (१४१५) यांनी प्रत्येकी चार गुण मिळवत संयुक्त आघाडी पटकावली आहे. त्यांना कनिष्का गाला (१४७९), लावण्या सिंग (१४४८), इशी सिंग (१५३८) आणि लिया कृष्णन (१५५८) या प्रत्येकी साडेतीन गुणांसह कडवी टक्कर देत आहेत. त्यामुळे या गटातील आघाडीची लढाई अधिकच रंगतदार झाली आहे.
१३ वर्षांखालील खुल्या गटात तिघांची विजयी घोडदौड
या गटात ओम रामगुडे (१९०६), विहान अग्रवाल (१८५८) आणि एआयएम कश्यप खाखरिया (१७८९) यांनी आपापल्या चारही लढती जिंकत प्रत्येकी चार गुणांची कमाई केली आहे. लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल, वाघोलीचा ओम, नारायणा ऑलिम्पियाड स्कूलचा विहान आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगलीचा कश्यप यांच्यात संयुक्त आघाडीसाठी चुरशीची लढत सुरू आहे.
१३ वर्षांखालील मुलींच्या गटात सहा जणींचा आघाडीवर कब्जा
स्पर्धेतील सर्वाधिक चुरस या गटात पाहायला मिळत आहे. तब्बल सहा खेळाडूंनी प्रत्येकी साडेतीन गुण मिळवत संयुक्त आघाडीवर स्थान मिळवले आहे. पहिल्या टप्प्यात ११ वर्षांखालील मुलींचे विजेतेपद पटकावणारी ग्रीनलॉन्स हायस्कूलची अग्रमानांकित त्वेषा जैन (१६९७), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाची प्रणिता भावा (१६५५), सी. एन. एम. स्कूल, विलेपार्लेची महुआ देशपांडे (१५२७), अवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूलची तिस्या पट्ट (१५२४), हिरानंदानी फाउंडेशन स्कूलची निश्का अग्रवाल (१५६२) आणि आय.ई.एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाची मानांकन नसलेली त्रिशा पांचाळ यांनी आघाडीच्या शर्यतीत एकत्रित मुसंडी मारली आहे.
हृदय मनियारची एकहाती सत्ता
या गटात अग्रमानांकित एआयएम हृदय मनियार (१९१०) याने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत सलग चार विजयांची नोंद केली आहे. चार गुणांसह त्याने एकट्याने आघाडीवर कब्जा केला आहे. मानांकन नसलेला अर्ह वाघमारे, युवराज सिंग (१६९०) आणि शौर्य मोदी (१६२६) हे प्रत्येकी साडेतीन गुणांसह त्याच्या पाठलागावर आहेत.
१७ वर्षांखालील मुलींत दृष्या नाईक अपराजित
मुलींच्या या गटात अग्रमानांकित दृष्या नाईक (१७१३) हिनेही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. सलग चार विजयांसह चार गुणांची कमाई करत तिने एकहाती आघाडी मिळवली आहे. श्रेया जोशी (१५२५), सायना नागरकट्टे (१४१९) आणि इक्षा सोनी (१५२८) यांनी प्रत्येकी तीन गुण मिळवत तिच्या आघाडीला आव्हान देण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
चार फेऱ्यांनंतर सहाही गटांतील आघाडीचे चित्र स्पष्ट होत असले, तरी अंतिम विजेतेपदाची लढाई अद्याप खुली आहे. आगामी फेऱ्यांत कोण बाजी मारणार आणि कोणाचे आव्हान संपुष्टात येणार, याकडे बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे.



