Chess Championship : बुद्धिबळाच्या पटावर मानांकितांचा झंझावात

३८७ युवा खेळाडूंचा राज्य शालेय अजिंक्यपदासाठी संघर्ष; सहाही गटांत मानांकित आणि बिगरमानांकित खेळाडूंच्या रंगतदार लढती

मुंबई :

बुद्धिबळाच्या पटावर अचूक चाली, आक्रमक डावपेच आणि विजयासाठीची जिद्द दाखवत मानांकित युवा बुद्धिबळपटूंनी महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात धडाकेबाज सलामी दिली. पहिल्याच दोन फेऱ्यांत अनेक अग्रमानांकितांनी सलग विजय नोंदवत आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र, कमी मानांकनाच्या आणि बिगरमानांकित खेळाडूंनीही दिग्गजांना आव्हान देत स्पर्धेतील रंगत वाढवली आहे.

इंडियन चेस स्कूलच्या वतीने दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेत ९, १३ आणि १७ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या अशा सहा फिडे मानांकित गटांत तब्बल ३८७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

Chess Championship - Voice of eastern
युवा खेळाडूंचा राज्य शालेय अजिंक्यपदासाठी संघर्ष

नऊ वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित अध्वान ओसवाल (१७२४) आणि पहिल्या टप्प्यात सात वर्षांखालील विजेता ठरलेला इवान दुबे (१५४५) यांनी प्रत्येकी दोन विजयांसह आघाडी घेतली. वीर शाह, अथर्व मुळीक, आरव देशमुख आणि निवेश पांचाळ यांनीही दोन गुणांची कमाई केली. बिगरमानांकित धार्विक परब, शिवांश भाला, वीरेन बोरिचा आणि झियान फतनानी यांनीही लक्षवेधी कामगिरी केली.

Chess Championship : लिया कृष्णन हिने दोन विजयांसह दबदबा कायम ठेवला

नऊ वर्षांखालील मुलींच्या गटात लिया कृष्णन (१५५८) हिने सलग दोन विजयांसह आपला दबदबा कायम ठेवला. मिराई सरदाना, खानक गडा, लावण्या सिंग आणि बिगरमानांकित मानसी दानू यांनीही आघाडीच्या फळीत स्थान मिळवले.

तेरा वर्षांखालील खुल्या गटात एआयएम कश्यप खाखरिया (१७८९) याने विजयी सुरुवात केली. अर्जुन प्रभू, रितिक बोप्पा, मयन झा आणि आराध्य वाघ यांनीही आघाडीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले. तेरा वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित त्वेषा जैन (१६९७) हिने दोन विजयांसह आपली ताकद दाखवली. प्रणिता भावा, महुआ देशपांडे, अरिहा देवरुखकर, निश्का अग्रवाल आणि तिस्या पट यांनीही संयुक्त आघाडी घेतली.

सतरा वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित एआयएम हृदय मनियार (१९१०) याने दोन्ही डाव जिंकत प्रतिस्पर्ध्यांना सावध केले. युवराज प्रताप सिंग, सोहम सहमाते, रोनित मोटवानी आणि बिगरमानांकित विहान सिंग यांनीही दोन गुण मिळवले.

सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित दृश्या नाईक (१७१३) हिने सलग दोन विजयांची नोंद केली. इक्षा सोनी, त्रिशा जगताप आणि सायना नागरकट्टे यांनीही विजयी लय कायम राखली. या स्पर्धेला राष्ट्रीय निवडीचे महत्त्व असल्याने आगामी फेऱ्यांतील प्रत्येक डाव निर्णायक ठरणार आहे. अहमदाबाद येथे १६ ते २० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, प्रत्येक गटातील अव्वल दोन खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

हेही वाचा : केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावर MPSC पात्र उमेदवाराची नियुक्ती करा!

Views: 5

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत