School : मुंबईतील १२४ शाळांवर होणार कारवाई 

मुंबई महापालिकेच्या १०४ शाळा तर शिक्षण निरीक्षकांतर्गत असलेल्या २० शाळांचा समावेश

मुंबई : 

शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याच्या (एसक्युएएएफ) अंतर्गत राज्यातील सर्व शाळांना स्वयं-मूल्यांकन करण्याचे आदेश दिले होते. स्वयं मूल्यांकन करण्यासाठी शाळांना वारंवार मुदतवाढ देऊनही राज्यातील तब्बल २ हजार ३ शाळांना स्वयं मूल्यांकनाकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये मुंबईतील १२४ शाळांचा समावेश असून, मुंबई महानगरपालिकेच्या १०४ शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या शाळांकडून एससीईआरटीने ‘खुलासा’ मागविला आहे.

राज्यातील शाळा सुरू voice of eastern
शाळा

राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी एसक्युएएएफअंतर्गत स्वयंमूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात येते. शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शाळांना एससीईआरटीच्या संकेतस्थळावरील एसक्युएएएफ ॲपवर माहिती भरून स्वयंमूल्यांकन करणे बंधनकारक करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी १६ मार्च ते १५ एप्रिल २०२६ स्वयं मूल्यांकनासाठी मुदत दिली होती. त्यानंतर १ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ आणि १५ मे २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देऊनही मुंबईतील १२४ शाळांना स्वयं मूल्यांकन केले नाही. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या व महापालिका अनुदानित १०४ शाळांचा तर मुंबई विभागीय निरीक्षकांच्या अंतर्गत असलेल्या २० शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. कांदिवली, दादर, परळ, वांद्रे, सांताक्रूझ, मालवणी, कांदिवली, घाटकोपर, चेंबूर आणि धारावी परिसरातील महापालिकेच्या शाळांबरोबरच खासगी आणि अन्य व्यवस्थापनांच्या शाळांचा या यादीत समावेश आहे. वारंवार मुदत देऊनही शाळांनी स्वयं मूल्यांकन न केल्याने त्यांना आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशाचा लाभ आणि शासनाकडून मिळणारे अनुदान का बंद करण्यात येऊ नये याबाबत एससीईआरटीने शाळांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच समाधानकारक खुलासा न देणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देशही शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

School list : मुंबईतील शाळांची यादी

मुंबई विभागीय निरीक्षकांच्या अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूल, लायन्स पायोनियर हायस्कूल, वांद्रेतील असेन्ड इंटरनॅशनल स्कूल, अनुदत्त विद्यालय इंग्लिश हायस्कूल, केंब्रिज स्कूल, कांदिवलीतील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, ठाकूर पब्लिक स्कूल (आयसीएसई) इत्यादी शाळांचा समावेश आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या व महापालिका अनुदानित १०४ शाळांमध्ये ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, ओम सिद्धी विनायक एमपीएस स्कूल, मालवणी महानगरपालिका माध्यमिक शाळा, एमपीएस मालवणी टाऊनशिप सीबीएसई, सेंट फ्रान्सिस इंग्लिश हायस्कूल, जिजाऊ अकॅडमी, शिवाजी एनजीआर मुन उर्द सेन नाईट स्कूल या शाळांचा समावेश आहे.

राज्यातील ९८.१५ टक्के शाळांनी केले स्वयं मूल्यांकन

स्वयं मूल्यांकनासाठी दिलेल्या पहिल्या मुदतीमध्ये राज्यातील १ लाख ८ हजार ९२ शाळांपैकी केवळ ४९ हजार ८४४ शाळांनी ही प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर दुसऱ्या मुदतीमध्ये ही संख्या ९६ हजार ६४० वर पोहोचली तर अंतिम मुदतीपर्यंत १ लाख ५ हजार ९९६ शाळांनी म्हणजेच ९८.१५ टक्के शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले. तसेच ९३ शाळा बंद होत्या. तर २ हजार ३ शाळांनी वारंवार सूचना देऊनही स्वयंमूल्यांकन केले नाही.

नागपूरमध्ये सर्वाधिक शाळा

एससीईआरटीने स्वयंमूल्यांकन पूर्ण न केलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ४७५ शाळा असून सोलापूरमधील १८२ शाळा, पुण्यातील ९५ शाळा, मुंबईतील १२४ शाळा, ठाण्यातील ९१ शाळा, बीडमधील ७१ तर छत्रपती संभाजीनगर येथील ७० शाळांचा समावेश आहे.

हेही वाचा : BMC : वाढीव विद्यावेतनापासून महापालिकेचे विद्यार्थी वंचित

Views: 55

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत