Dadar Passenger : कोकणची दादर पॅसेंजर रखडली; रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा
मुंबई-सावंतवाडी एक्सप्रेस पॅसेंजरचा पर्याय ठरू शकत नाही; मध्य रेल्वेचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून प्रलंबित
मुंबई :
कोरोना काळात बंद झालेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी कोकणातील प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. १६ नोव्हेंबर १९९६ रोजी सुरू झालेली ५०१०३/५०१०४ क्रमांकाची ही गाडी २० मार्च २०२० पर्यंत नियमित धावत होती. मात्र, त्यानंतर सेवा पूर्ववत न झाल्याने पेण ते रत्नागिरीदरम्यानच्या अनेक लहान स्थानकांवरील प्रवाशांची मुंबईशी असलेली थेट रेल्वे जोडणी खंडित झाली आहे. मध्य रेल्वेने १४ मे २०२६ रोजी ही सेवा दादरपर्यंत विस्तारित करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला असून, त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मुंबई-सावंतवाडी रोड एक्सप्रेस सुरू झाल्याने पॅसेंजरची गरज संपली, असे मानणे चुकीचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. एक्सप्रेस आणि पॅसेंजर या गाड्यांचे थांबे व वेळापत्रक वेगवेगळे असल्याने दोन्ही सेवा एकमेकींचा पर्याय ठरू शकत नाहीत.

रत्नागिरी-दादर पॅसेंजरला नागोठणे, कोलाड, इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवणखवटी, कळंबणी बुद्रुक, अंजणी, कामथे, कडवई, उक्षी आणि भोके यांसारख्या स्थानकांवर थांबे होते. त्यामुळे या भागातील ग्रामीण प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा मिळत होती. मात्र, मुंबई-सावंतवाडी रोड एक्सप्रेसला यापैकी बहुतांश स्थानकांवर थांबे नसल्याने स्थानिक प्रवाशांची गैरसोय कायम आहे.
दोन्ही गाड्यांच्या वेळेतही मोठा फरक आहे. पॅसेंजर मुंबईहून दुपारच्या सुमारास सुटत होती, तर एक्सप्रेस रात्री सुटते. दोन्ही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत सुमारे नऊ तासांचे अंतर आहे. शिवाय, पेण ते खेडदरम्यानच्या अनेक स्थानकांवर एक्सप्रेस मध्यरात्री एक ते पहाटे तीनच्या सुमारास पोहोचते. या वेळेत वाहनांची अनुपलब्धता, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि स्थानकापासून गावापर्यंत पोहोचण्याची अडचण यामुळे ग्रामीण प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दिवसा धावणाऱ्या पॅसेंजरची गरज कायम असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
Dadar Passenger : रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव प्रलंबित
रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी दैनिक पॅसेंजरचा अंतिम टर्मिनल दिवा येथून दादरपर्यंत विस्तारित करण्यासाठी मध्य रेल्वेने १४ मे २०२६ रोजी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला आहे. T.649.A/37/MR/XIII/D (RE-REVISED) या क्रमांकाचा हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे त्याची सद्यस्थिती स्पष्ट करून रेल्वे बोर्डाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्रस्तावाला मंजुरी देऊन रत्नागिरी-दिवा-दादर दैनिक पॅसेंजर सेवा पूर्ववत करावी आणि मुंबई-सावंतवाडी एक्सप्रेस सुरू असल्याचे कारण देऊन ही मागणी नाकारू नये, अशी भूमिका प्रवाशांनी मांडली आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि रुग्णांसह सर्वसामान्य ग्रामीण प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणारी ही सेवा पुन्हा सुरू झाल्यास कोकणातील अनेक लहान स्थानकांची मुंबईशी थेट रेल्वे जोडणी पुनर्स्थापित होऊ शकते. त्यामुळे रेल्वे बोर्डाच्या निर्णयाकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.



