MRI technology : मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य सेवेला अत्याधुनिक एमआरआय तंत्रज्ञानाची जोड
महापौर रितू तावडे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या हस्ते ३ टेस्ला एमआरआय लोकार्पण
मुंबई :
नायर आणि केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय यंत्राचे १९ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार बनविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजले जात असून, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
मुंबई महानगरपालिकेच्या नायर आणि केईएम या दोन प्रमुख रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीय रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये मोठा खर्च करण्याऐवजी महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच आधुनिक निदान सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक एमआरआय यंत्रणेमुळे मेंदू, मज्जासंस्था, मणका, सांधे, रक्तवाहिन्या तसेच शरीरातील विविध गुंतागुंतीच्या आजारांचे अधिक स्पष्ट, अचूक आणि सखोल निदान करणे शक्य होणार आहे. आजाराचे स्वरूप आणि तीव्रता अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत होणार असून, त्यानुसार उपचारांची दिशा निश्चित करणे आणि रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून देणे अधिक सुलभ होणार आहे. या सुविधांचा लाभ वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठीही होणार आहे.

यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा यामिनी जाधव, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजी विभागातील डॉक्टर, वैद्यकीय व तांत्रिक पथक तसेच महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
महापौर रितू तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक, दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आजच्या वैद्यकीय क्षेत्रात अचूक निदान हे प्रभावी उपचारांचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. ३ टेस्ला एमआरआय मशीनमुळे गंभीर तसेच गुंतागुंतीच्या आजारांचे अधिक अचूक निदान करणे शक्य होणार असून, रुग्णांना योग्य उपचार वेळेत मिळण्यास मदत होईल, असे सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सांगितले.
MRI technology : अधिक स्पष्ट आणि अचूक निदान
पूर्वीच्या १.५ टेस्ला एमआरआय यंत्रणेमध्ये काही वेळा स्पष्टपणे निदर्शनास न येणाऱ्या अतिसूक्ष्म विकृती, लहान गाठी आणि गुंतागुंतीच्या आजारांचे अधिक स्पष्ट व अचूक निदान करणे शक्य होणार आहे. नवीन ३ टेस्ला एमआरआय मशीनद्वारे विविध अत्याधुनिक इमेजिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.
– फंक्शनल इमेजिंग (Functional Imaging)
– नॉन-कॉन्ट्रास्ट व्हॅस्क्युलर इमेजिंग (Arterial Spin Labelling)
– कार्टिलेज मॅपिंग (Cartilage Mapping)
– इलॅस्टोग्राफी (Elastography)
धोरणात्मक गुंतवणूक – रुग्णांना परवडणारी सेवा
₹ ३८ कोटींची गुंतवणूक : अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय मशीनची खरेदी
१० वर्षांचे तांत्रिक सहाय्य : मशीनची देखभाल आणि तांत्रिक सहाय्यासाठी १० वर्षांची सुविधा
परवडणारे दर : प्रत्येक एमआरआय स्कॅनसाठी केवळ ₹ २,५०० इतके सवलतीचे शुल्क निश्चित
३००० चौरस फुटांत अत्याधुनिक सुविधा
रुग्णांच्या सोयीसाठी आणि कार्यक्षम निदान सेवेसाठी सुमारे ३००० चौरस फूट क्षेत्रफळात सुसज्ज विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.
– कन्सोल आणि रिपोर्टिंग रूम
– गॅन्ट्री रूम
– रुग्ण प्रतीक्षा कक्ष
– रुग्ण निरीक्षण कक्ष
– अपॉइंटमेंट कक्ष
– सेमिनार कक्ष



