Mumbai University : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
मुंबई :
महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नऊ प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये स्थायी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ यांच्या नेतृत्वाखाली फोर्ट व विद्यानगरी परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये शिक्षकेतर कर्मचारी सेवक संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने विद्यापीठाच्या फोर्ट व विद्यानगरी परिसरात जोरदार आंदोलन केले. सातव्या वेतन आयोगानुसार १०:२०:३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, रिक्त पदे भरणे, वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करणे या महत्त्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान फोर्ट आणि विद्यानगरी येथे द्वार सभांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आंदोलनाची पार्श्वभूमी, प्रलंबित मागण्यांचे स्वरूप, शासनस्तरावरील सद्यःस्थिती आणि आंदोलनाच्या पुढील टप्प्यांबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आंदोलनाच्या पुढील टप्प्यांमध्येही सर्व कर्मचाऱ्यांनी संघटितपणे सहभागी होण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आले.
Mumbai University : निर्णय न झाल्यास २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप पुकारणार
शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी ठोस निर्णय न घेतल्यास, आंदोलनाचा पुढील तिसरा टप्पा म्हणून २६ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याचे संयुक्त कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनात मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष नरेश वरेकर, सरचिटणीस अविनाश तांबे यांच्यासह महासंघाचे व संघाचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य आणि फोर्ट व विद्यानगरी परिसरातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



