Tukaram Mundhe : कार्तिकी वारीनिमित्त पंढरपुरातील ५४ दुकानांची अचानक तपासणी
चार दुकानांचे परवाने निलंबित; उपवासाचे पदार्थ आणि प्रसादाचे २० नमुने तपासणीसाठी घेतले
मुंबई :
कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेंतर्गत १८ नोव्हेंबरपर्यंत हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी आणि प्रसाद विक्री केंद्रांसह ५४ आस्थापनांची अचानक तपासणी केली. वारीमध्ये उपवासाच्या पदार्थांना आणि प्रसादाला मोठी मागणी असल्याने त्या पदार्थांचे २० नमूने विश्लेषणांसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तर चार आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
२१ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी असल्याने पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. एकादशीनिमित्त भाविक उपवास करत असल्याने वारीच्यादरम्यान उपवासाच्या पदार्थांना तसेच प्रसादाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक आणि विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता यांची एफडीएकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये १८ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर परिसरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी आणि प्रसाद विक्री केंद्रांसह ५४ आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये भगर, बटाटा चिवडा, राजगिरा लाडू, चिक्की, बेसन आणि प्रसादाचे पेढे अशा पदार्थांचे एकूण २० नमुने घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीतून खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता पडताळली जाणार आहे.

एफडीएने केलेल्या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्याचे आढळल्याने चार आस्थापनांचे नोंदणी परवाने निलंबित करण्यात आले. त्यामध्ये स्टेशन रोडवरील द पॉप्यूलर रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, बेकरी ॲंड कोल्ड्रींक्स, शिवाजी चौकातील बेंगलोर अय्यंगार बेकरी, कोर्टी रोड, इसबावी येथील श्री महावीर प्युअर व्हेज आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शॉपिंग सेंटर १ मधील स्वागत एंटरप्रायजेस यांचा समावेश आहे.
Tukaram Mundhe : व्यापाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना
तपासणी मोहिमेसोबतच घाऊक व किरकोळ विक्रेते आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची जनजागृती बैठक घेण्यात आली. या बैठकीत भगर आणि अन्य खाद्यपदार्थ प्रमाणित स्रोतांकडूनच खरेदी करण्याचे, पदार्थांची मुदत (एक्सपायरी डेट) आणि लेबलिंग तपासण्याचे निर्देश देण्यात आले. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा वापर करणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे, शिळे किंवा दूषित अन्न विक्री न करणे, तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता राखणे याबाबत व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.



