Blood shortage : दिवाळी, नाताळानिमित्त सुट्यांमुळे रक्ताच्या तुटवड्याची शक्यता
रेल्वे स्थानके आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये शिबिरे घेण्याचे एसबीटीसीचे निर्देश
मुंबई :
दिवाळी व नाताळामध्ये महाविद्यालय व शाळांना सुट्या असल्याने नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये रक्तदात्यांचे बाहेरगावी जातात. त्यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी होते. परिणामी मुंबईसह राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांनी उपलब्ध रक्तसाठ्याचा आढावा घेऊन गरजेनुसार स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) राज्यातील रक्तपेढींना दिले आहेत.

महाविद्यालयांमधील विद्यार्थी हा रक्तदानाचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दिवाळी व नाताळनिमित्त महाविद्यालये आणि शाळांना सुट्या असतात. या काळात अनेक विद्यार्थी आणि नियमित रक्तदाते बाहेरगावी जात असल्याने रक्तसंकलनावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्याचदा नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारामध्ये अडचणी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यासाठी एसबीटीसी विशेष नियोजन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना दिल्या आहेत.
blood shortage : सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संस्थांना आवाहन
रक्तपेढी प्रमुखांनी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संस्थांशी संपर्क साधून गरजेनुसार स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. मुंबईतील शासकीय रक्तपेढ्यांनी रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरे घ्यावीत. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रक्तसंकलन वाहन पाठवून रक्त संकलित करण्यावर भर द्यावा, असेही निर्देशही एसबीटीसीने दिले आहे. राज्यातील रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये आणि गरजेच्या वेळी पुरेसा रक्तसाठा उपलब्ध राहावा, यासाठी सर्व रक्तकेंद्रांनी या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. सुहास मोहनाळकर यांनी केले आहे.



