WhatsApp Office : रुग्णांच्या औषध हक्कांसाठी महापालिकेत ‘व्हॉट्सॲप कार्यालय’
औषध तुटवड्यावर उपाययोजनेसाठी ‘औषध हक्क नियंत्रण कक्ष’ सुरू होणार
मुंबई :
महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावेत, तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी व तक्रारींचा तातडीने निपटारा करता यावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षांच्या कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी ‘व्हॉट्सॲप कार्यालय’ आणि ‘औषध हक्क नियंत्रण कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे.

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध होत असताना रुग्णांच्या औषध उपलब्धतेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. रुग्णालयांमध्ये वारंवार असलेल्या औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य सहज उपलब्ध व्हावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि आरोग्यसेवांमधील पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढावे, यासाठी आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातच ‘व्हॉट्सॲप कार्यालय’ आणि ‘औषध हक्क नियंत्रण कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला काहीही अडचण, समस्या निर्माण झाल्यास त्याची तक्रार ‘व्हॉट्सॲप कार्यालया’च्या क्रमांकावर नागरिकांना नोंदविता येणार आहे. या तक्रारीची दखल थेट आरोग्य समिती अध्यक्षांकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना अवघ्या काही वेळात त्यांच्या तक्रारीवर उत्तर मिळण्यास मदत होणार आहे. ‘व्हॉट्सॲप कार्यालया’मुळे आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि रुग्णाभिमुख बनविण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे.
महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देणे आणि प्रत्येक रुग्णाला आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य मिळण्याचा हक्क निश्चित करणे, याला आमचे प्राधान्य आहे. रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सांगितले.
WhatsApp Office : पीपीपी तत्त्वावर ‘औषध हक्क नियंत्रण कक्ष’ स्थापन करणार
मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर ‘औषध हक्क नियंत्रण कक्ष’ स्वतंत्ररित्या स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली असून, या माध्यमातून रुग्णालयांमधील औषधांचा साठा, औषधांची उपलब्धता आणि वैद्यकीय साहित्याच्या पुरवठ्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. रुग्णांना रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून महागड्या दराने औषधे खरेदी करावी लागू नयेत, तसेच त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे भांदिर्गे यांनी सांगितले.



