ST : एसटीत होऊ घातलेल्या कंत्राटीकरणाविरुद्ध लढा देऊ – बरगे यांचा इशारा
अमरावती :
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. आज त्यांची जयंती आहे.त्याच प्रेरणेने एसटीतील कंत्राटी भरतीविरुद्ध लढा देऊ, असा निर्धार महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला.
चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने आयोजित क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त होणारे श्री. विनोद वानखडे व श्री. धनंजय दुधाट यांचा सत्कार करण्यात आला, तसेच संघटनेत नव्याने प्रवेश करणाऱ्या इतर संघटना मधील कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांनी अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात इंग्रजांच्या आणि सावकारांच्या शोषणाविरुद्ध लढा उभा केला. त्यांनी सांगितले – जल, जंगल, जमीन ही आमची आहे, गुलामगिरीत जगण्यापेक्षा स्वाभिमानाने लढणे श्रेष्ठ आहे. हे सांगून संघटित होऊन लढायला शिकवले. त्यांचा प्रेरणादाई आदर्श घेऊन सर्वांनी काम केले पाहिजे.
बरगे पुढे म्हणाले की, आज एसटी कर्मचाऱ्यांसमोरही तसाच अन्याय आहे, कंत्राटीकरण म्हणजे आधुनिक गुलामगिरीच आहे. त्याला क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने विरोध करण्यात आला पाहिजे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क साठी १६,७१७ पदांची कायमस्वरूपी भरती जाहीर केली आहे. तलाठी, लिपिक, कर सहायक अशी हजारो पदे कायम भरली जात आहेत. त्याच वेळी एसटी महामंडळात मात्र १७,७४२ चालक-वाहकांची कंत्राटी भरती करण्याचा घाट घातला जात आहे. एका विभागात कायम, दुसऱ्या विभागात कंत्राटी – हीच सरकारची दुटप्पी भूमिका आहे. सरकारने एसटीला कायम स्वरुपी भरती करायला का परवानगी दिली नाही.? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ST : एसटीत चालकांची १०,६८९ पदे रिक्त
एसटीत चालकांची १०,६८९ पदे रिक्त आहेत. दापोडी कार्यशाळेत ७०० बस चालकाअभावी उभ्या आहेत. नव्या ८,३०० बसेस येत आहेत. तरीही सरकार कायम भरतीला परवानगी देत नाही. उलट एसटीचे ४०० ते ५०० चालक गेली ५ वर्षे आरटीओच्या दिमतीला देऊन ठेवले आहेत.
एसटीचे काम हे कार्यालयीन काम नाही. चालकाच्या हातात ५० पेक्षा जास्त प्रवाशांचा जीव असतो. अशा ठिकाणी ३ वर्षांच्या कंत्राटावर, अवघ्या २५-३० हजार पगारावर कामगार ठेवणे म्हणजे सुरक्षिततेशी तडजोड आहे. कंत्राटी कामगाराला ना नोकरीची हमी, ना पगाराची शाश्वती. अशा तणावात चालक गाडी कशी चालवणार? सरकारला प्रवाशांचा जीव स्वस्त वाटतो का? असा सवाल बरगे यांनी केला.
वानखडे आणि दुधाट यांनी एसटीप्रती आपली निष्ठा जपली. उन्हात, पावसात, सणावाराला प्रवाशांची सेवा केली. अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे, हेच खरे क्रांतिसूर्य बिरसा मुंडांना अभिवादन आहे. पण उद्याच्या पिढीला कंत्राटी म्हणून गुलाम बनवायचे, हे सहन करणार नाही, असे बरगे म्हणाले. शासनाने जर त्यांची गट-क ची १६,७१७ पदे कायम भरली, तर एसटीची १७,७४२ पदे कायम का नाही? एसटी कामगार हा दुसऱ्या दर्जाचा नागरिक आहे का? एसटीत कायम भरती करा, नाहीतर क्रांतिसूर्य बिरसा मुंडांच्या विचाराने रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा बरगे यांनी दिला.
यावेळी संघटनेचे अमरावती विभागाचे अध्यक्ष जयंत मुळे, विभागीय सचिव संदीप मुळे, प्रवीण चरपे, विकी यादव, शिवदास स्वर्गे, राम अजमिरे, रणजीत तायडे, प्रमोद दिपटे, पंकज पांडव, प्रमोद गोदे, मंगेश पोलाड, धीरज कच्चवे, मंगेश आगाशे, उमेश म्हस्के, रुपेश कोकाटे, संदीप कुबडे, पुरुषोत्तम मोकाशे, रोशन मडगे, चंद्रकांत पर्वत, मीनाक्षी पुडके, रंजना कोल्हारे, वृषाली वाघमारे, पूनम ठाकरे, शुभांगी सारवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



