Mumbai University : मुंबई विद्यापीठात ‘प्रकल्प प्राण’द्वारे हरित वारसा संवर्धनाचा उपक्रम
१३५ वर्षांहून अधिक जुन्या वडवृक्षाचे जतन, प्राचीन दगडांचे संवर्धन आणि जैवविविधतेबाबत जनजागृतीवर भर
मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘प्रकल्प प्राण – हरित वारसा संवर्धन उपक्रम’ हाती घेण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यापीठाच्या समृद्ध वारशाचे पुनरुज्जीवन आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रकल्पांतर्गत विद्यापीठ परिसरातील हरित जागांचे संवर्धन, १३५ वर्षांहून अधिक जुन्या वडवृक्षाचे जतन, प्राचीन दगडांचे संवर्धन, जैवविविधतेविषयी जनजागृती आणि लुप्त होत चाललेल्या कला-कौशल्यांच्या जतनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करून भावी पिढ्यांसाठी त्याचे जतन करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
ओशियन नेटवर्क एक्सप्रेस यांच्या सीएसआर सहकार्याने, रोटरी क्लब ऑफ मुंबई मकाबो यांच्या प्रकल्प नेतृत्वाखाली, रोटरी क्लब ऑफ बोरिवली आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संस्थात्मक भागीदारीत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि उपकुलसचिव अशोक घुले उपस्थित होते.
Mumbai University : प्रत्येक ठेव्यामध्ये इतिहास आणि सांस्कृतिक ओळख दडलेली आहे
यावेळी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, विद्यापीठाच्या परिसरातील हरित जैवविविधतेने नटलेला समृद्ध निसर्ग, जैवविविधता आणि ऐतिहासिक ठेवा हा महत्त्वाचा वारसा आहे. १३५ वर्षांहून अधिक जुना वडवृक्ष असो किंवा प्राचीन दगडांचा वारसा, या प्रत्येक ठेव्यामध्ये आपला इतिहास आणि सांस्कृतिक ओळख दडलेली आहे. या वारशाचे जतन करणे ही केवळ आजची गरज नसून भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती, पारंपरिक आकृतिबंध आणि कलात्मक नक्षीकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या वारली, गोंड, मधुबनी, सौरा आणि पिथोरा यांसारख्या जगप्रसिद्ध आदिवासी चित्रशैलींमधून भारतीय संस्कृती, निसर्ग, जैवविविधता आणि लोकजीवनाचे दर्शन घडते. या चित्रपरंपरा भारतीय सांस्कृतिक वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ मुंबई मकाबोचे अध्यक्ष रोटेरियन नवीन मिश्रा आणि रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या अध्यक्षा रोटेरियन आरती यांनी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या दिशेने रोटरीची कटिबद्धता व्यक्त केली.
प्रकल्पाच्या संकल्पना आणि अंमलबजावणी समन्वयात लोप़ा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच ओशियन नेटवर्क एक्सप्रेसचे संचालक मसाहिरो साकिकुबो यांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी कॉर्पोरेट संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्यांच्या पुनर्वापरासाठी उभारण्यात आलेल्या बाटली श्रेडिंग मशीनचे प्रात्यक्षिक. या माध्यमातून प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, पुनर्चक्रण आणि पर्यावरणपूरक सवयींबाबत जनजागृती करण्यात आली.
‘As ONE We Can’ या संकल्पनेतून राबविण्यात येणारा ‘प्रकल्प प्राण’ हा केवळ वृक्षसंवर्धनापुरता मर्यादित नसून नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या एकात्मिक संवर्धनाचा प्रयत्न आहे. विद्यापीठ परिसर अधिक हरित, जैवविविधतेने समृद्ध आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



