MHT Cet : सीईटी परीक्षेबाबत कथित ध्वनिफिती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबई :
सीईटी परीक्षेसंदर्भात उमेदवारांच्या परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून गुण वाढवून देण्याबाबतच्या कथित संभाषणाच्या ध्वनिफितीविरोधात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल केली.
सीईटीच्या परीक्षेबाबत एक ध्वनीचित्रफिती संदर्भातील तक्रार सीईटी कक्षाकडे करण्यात आली होती. या चित्रफितीमधील संभाषणामध्ये एका महिलेने दूरध्वनीद्वारे एका पुरुषाशी संभाषण करताना आर्थिक मोबदला स्वीकारून एमएचटी सीईटी परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करणे, उमेदवाराची परीक्षा नियोजित पद्धतीने पार पाडणे तसेच संबंधित उमेदवाराचे गुण वाढवून देण्याबाबत आश्वासन दिल्याचे निदर्शनास येते.
या संभाषणामध्ये आर्थिक व्यवहाराचा उल्लेख करण्यात आलेला असून, अशा प्रकारे आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून उमेदवारास अनुचित लाभ मिळवून देण्याबाबत करण्यात आलेली विधाने अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह स्वरूपाची आहेत. अशा प्रकारच्या कथित गैरप्रकारामुळे एमएचटी सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर, निष्पक्षतेवर व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी सीईटी कक्षाने ध्वनिफीतची लेखी तक्रार आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये केली आहे.
या चित्रफितींची सत्यता पडताळून, आवश्यकतेनुसार तांत्रिक तपासणी करून, संबंधित व्यक्तींची चौकशी
करून प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, ही विनंती सीईटी कक्षाने पोलिसांना केली आहे.
Mht cet : सोशल मिडियावरील २ पोस्ट हटविल्या
सीईटी कक्षाबाबत समाज माध्यम व इतर माध्यमातून चुकीची माहिती, दिशाभूल करणारी, अपूर्ण, असत्य माहिती प्रसारित केली जात असल्याचे सीईटी कक्षाच्या निदर्शनास आल्याने, या माहितीची पडताळणी करून आवश्यकतेनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. या टास्क फोर्सने आजपर्यंत डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनलला व नाशिकच्या स्पेक्ट्रम अकॅडमी यांच्यातर्फे प्रसारित केलेल्या इंस्टाग्रामवरील रिल्समध्ये, “२०२७ च्या सीईटी परीक्षेच्या तारखा” जाहीर केल्या होत्या. त्यांना सीईटी कक्षातर्फे कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. यावर डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनलने यूट्यूबवरून चुकीचा व दिशाभूल करणारा व्हिडीओ हटविला तसेच नाशिकच्या स्पेक्ट्रम अकॅडमीनेदेखील इंस्टाग्रामवरील त्यांची रील्स हटविली.



